ध्यानात ठेवा,चिमटा घेतला की मी चिमटा काढत नाही, त्याला घोडा लावतो; तानाजी सावंत यांचा विरोधकांना इशारा
विधानसभेची लगीनघाई अवघ्या एक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक पक्षाने त्यासाठी चिंतन, मनन केले. आता अनेक मातब्बर नेते थेट मैदानात उतरले आहे. काही जणांनी यात्रा काढली, तर कुणी मोर्चाला, आंदोलनाला सुरूवात करून वातावरण निर्मिती सुरू केली आहे. त्याला धाराशिव जिल्हा पण अपवाद नाही. धाराशिवमध्ये पण विधानसभेपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. परंडा मतदारसंघात चुरशीची लढत होणार की एकहाती सामना खेचून आणणार याची चर्चा रंगली आहे. त्यातच पालकमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना ललकारले आहे.
तानाजी सावंतांनी लावला सुरूंग
परंडा विधानसभा मतदारसंघासाठी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आताच विरोधकांना हाबाडा दिला. विधानसभेपूर्वीच त्यांनी डाव टाकला. या मतदारसंघात माजी आमदार राहुल मोटे यांच्याशी त्यांची लढत होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यापूर्वी सावंत यांनी तीन माजी आमदारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला. त्यांच्या या खेळीने या मतदारसंघात वातावरण तापले आहे.
मेळाव्यात जोरदार फटकेबाजी
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात परंडा शहरातील बुथ प्रमुख व कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात सावंतांनी विरोधकांना सज्जड दम भरला तर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची हमी भरली. सर्व राज्याला माहिती आहे की मी काय करु शकतो, याची आठवण त्यांनी यावेळी विरोधकांना करून दिली. त्यांनी या मेळाव्यात जोरदार फटकेबाजी केली.
मी घोडा लावतो
चिमटा घेतला की मी चिमटा काढत नाही त्याला घोडा लावतो हे ध्यानात ठेवा, असा सज्जड त्यांनी विरोधकांना दिला. सत्तांतर केलं आपले लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 16 हजार कोटीचा निधी आपल्यासाठी मंजूर केला. जर आपण 2019 ला मंत्री असतो तर त्याचवेळी उजनीच्या पाण्याने आपल्या सर्व भूम धाराशिव जिल्हयातील धान्य जगली असती पण दुर्दैव असे झाले नाही.
पण हे 2022 ला करून दाखवलं कारण आपल्याला कोणी चिमटा घेतला त्याला आपण चिमटा घेत नाही. कारण भाई तुमच्या सारखीच माझी सवय आहे आर म्हटलं की कारं म्हणायचं.चिमटा घेतला की मी चिमटा काढत नाही त्याला घोडा लावतो हे ध्यानात ठेवायचं. जे तुमच्याकडं हाय ते माझ्याकडे भी हाय. जे तुम्हाला येत त्याच्या दहा पट मला येत हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे ज्याला कुणाला खुमखुमी असेल त्याने नाद करायचा नाही, असा इशारा त्यांनी दिला.
पोट दुखीच्या गोळ्या माझ्याकडे
आरोग्य खातं माझ्याकडे आहे. पोटात दुखायला लागलं की गोळ्या माझ्याकडे आहेत. चिंता करायची कारण नाही, असा चिमटा त्यांनी या मेळाव्यातून विरोधकांना काढला. महिलांना मुख्यमंत्री यांनी मोफत शिक्षण दिलं. 1 रूपयामध्ये पीकविमा योजना आणलीय महात्मा फुले योजना दीड लाखांची पाच लाख केली आज त्या ठिकाणी कुठल्या रेशनकार्डची अट नाही. लाडकी बहीण योजना आणली प्रत्येक कुटूंबात एक नाही तर दोन महिला असतात त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत.रेशन फुकट मिळतंय. हे सगळं बघून हयांच्या पोटात प्रचंड कळा यायला लागल्यात पण हया लोकांना माहित नाही, आरोग्य खात माझ्याकडे आहे पोटात दुखायला लागलं की गोळ्या माझ्याकडं आहेत त्यांनी चिंता करायचं कारण काही नाही, असे म्हणताच सभा स्थळी एकच हशा पिकला.