वेरुळ लेणीतील भगवान बुद्ध मूर्तीवर किरणोत्सव

माणदेश एक्सप्रेस न्युज
वेरूळ : जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असलेल्या वेरूळ लेणीतील क्रमांक १० च्या लेणीतील भगवान बुद्ध मूर्तीवर १० मार्च रोजी किरणोत्सवाचा क्षण पर्यटकांनी टिपला. मोबाईल फोनमध्ये हा क्षण टिपण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.
स्थापत्य कलाविष्काराचा अद्धभुत नमूना असलेल्या वेरूळ लेणीमध्ये एकूण ३४ लेण्या आहेत. यामध्ये १२ बुद्ध लेणी आहेत. तर यातील १० क्रमांकाची बुद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बुद्ध लेणी या विहार आहेत. यातील १० व्या क्रमांकाच्या बुद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे पडतात.
महाराष्ट्रातील बुद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महायानास समर्पित आहे. तर यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पे पहावयास मिळतात. यालाच सुतार की झोपड़ी किंवा विश्वकर्मा मंदिर ही म्हणतात. तर गुजरातमधील लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून येथे नमन करतात. याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथात ही आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध बोधिवृक्षाखाली (पिंपळ) बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात. भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पहावयास मिळतात. तर मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून सकाळी व संध्याकाळी आरतीला बोलविण्याची प्रथा होती.