आटपाडी : नागपंचमी यात्रेची अंबाबाई मंदिर पटांगणात जोरदार तयारी
दिनांक ०९ रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील अंबाबाई मंदिर पटांगणात नागपंचमी निमित्त यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते. या यात्रेची जोरदार तयारी आटपाडी नगरपंचायत यांच्याकडून करण्यात येत असून या ठिकाणी यात्रेसाठी खेळणीवाले, पाळणे, हॉटेल यांची लगभग असून, यात्रा पटांगण भरून गेले आहे.
आटपाडी शहरासह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून येथील अंबाबाई देवस्थान हे नाग देवता म्हणून प्रसिद्ध आहे. येथे नागपंचमीला मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी आटपाडी शहरासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने नाग देवताचे आशीर्वाद घेत असतात. या ठिकाणी यात्रेला सध्या मोठ्या स्वरूपाचे रूप आले असून यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने या ठिकाणी हॉटेल, भेळ, वडापावचे गाडे, स्टेशनरी साहित्याची दुकाने, लहान मोठ्यांचे पाळणे आदी यात्रेसाठी सज्ज झाले आहेत.
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या ठिकाणी जाणारे रस्ते, यात्रा भरते त्या ठिकाणचे अंतर्गत रस्ते यांची डागडुजी नगरपंचायतच्या वतीने करण्यात आली असून, या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली गेली आहे. यात्रेनिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने नगरपंचायतच्या वतीने सर्व त्या आवश्यक गोष्टी पुरविण्यात येत आहेत. उद्या दिनांक ०९ रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे.