भजनी मंडळांना साहित्य वाटपामुळे गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन : तानाजीराव पाटील
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर-आटपाडीचे माजी आमदार कै. अनिलभाऊ बाबर त्यांच्या पत्नी कै. शोभाकाका बाबर यांच्या स्मरणार्थ आटपाडी तालुक्यातील भजनी मंडळांना भजनाचे साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील म्हणाले, माजी आमदार कै. अनिलभाऊ बाबर आणि त्यांच्या पत्नी कै. शोभाकाका बाबर यांच्या स्मरणार्थ आटपाडी तालुक्यातील भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप केले असून, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. या उपक्रमामुळे गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत होते. भजन साहित्याच्या वाटपामुळे स्थानिक भजनी मंडळे अधिक प्रेरित होऊन भजन गाण्याच्या आणि पारंपरिक संगीताच्या माध्यमातून भक्ती आणि संस्कारांचे प्रचारक बनतील असे ते म्हणाले.
भजन साहित्यामध्ये सूरपेटी, पकवाज, टाळ आदी साहित्य आहे. तालुक्यातील 65 भजनी मंडळाची नोंद झाली असून सर्व वारकरी संप्रदायाला भजनी मंडळाचे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी आटपाडी तालुका शिवसेना प्रमुख साहेबराव पाटील, दत्तात्रय पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख मनोज नांगरे-पाटील, अरविंद चव्हाण, रामदास सूर्यवंशी, विश्वजीत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.