आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. ७ मधून भाजपचे डॉ. जयंत शिवाजीराव पाटील विजयी

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपचे उमेदवार डॉ. जयंत शिवाजीराव पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आज (दि. २१) तहसील कार्यालय, आटपाडी येथे झालेल्या मतमोजणीत त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेत विजयी मुसंडी मारली. त्यांच्या विजयानंतर प्रभागात भाजप कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, फटाक्यांची आतषबाजी व जल्लोष करण्यात आला.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये यंदा चौरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपकडून डॉ. जयंत शिवाजीराव पाटील यांना एकूण ३०० मते मिळाली. शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे शहाजी यशवंत जाधव यांना २७२ मते मिळाली असून, ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पोपट मारुती पाटील यांना १६१ मते प्राप्त झाली. NOTA पर्यायाला ४ मते मिळाली.
त्यांच्या विजयामुळे आटपाडी नगरपंचायतीत भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे राजकीय निरीक्षकांकडून सांगण्यात येत आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. जयंत शिवाजीराव पाटील यांनी प्रभागातील मतदारांचे आभार मानले. “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व नागरी सुविधा यांना प्राधान्य देऊन काम केले जाईल,” असे त्यांनी सांगितले.




