सांगली पोलिसांची मोठी कारवाई; आटपाडीला जाणारी ११ लाख रुपयांची विदेशी दारू सह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
दोन आरोपी अटकेत

माणदेश एक्सप्रेस न्यूज : सांगली : पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठा यावर कडक कारवाईसाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत आटपाडी येथे बेकायदेशीरपणे वाहतूक होत असलेला विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.
दिनांक २० जून २०२५ रोजी सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील सपोफौ अनिल ऐनापुरे, पोहेकॉ अतुल माने आणि पोना रंजीत जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, आटपाडी येथील अक्षय वाघमारे हा एमएच १० डीटी ७२०५ या टेम्पोमधून विदेशी दारू वाहून नेत आहे.
पथकाने तासगाव फाटा ते कूमटा फाटा रोडवर सापळा रचून टेम्पो अडवला. वाहन चालक अक्षय प्रदीप वाघमारे (वय २०, रा. मुलाणकी वस्ती, आटपाडी) व सोबत नानासाहेब आनंदा पाटील (वय ५१, रा. पाटील मळा, आटपाडी) असे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. वाहनाची तपासणी केली असता टेम्पोच्या हौदयात विदेशी दारू व बिअरच्या बॉक्सचा साठा आढळून आला.
वाहतुकीसाठी परवाना आहे का, याची विचारणा केली असता दोघांनीही परवाना नसल्याचे कबूल केले. त्यांनी हा माल मिरज येथील संगम वाईन शॉपमधून आणला असून आटपाडी येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.
सदर विदेशी दारू व बिअरचा साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस करीत आहेत.



