राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होण्याअगोदरचा ‘एबी’ फॉर्मचे वाटप ; १७ उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी यादी प्रत्येक पक्ष जाहीर करत आहेत. यामध्ये भाजपने आघाडी घेतली असून ९९ उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मात्र या सगळ्यावर मात करत, चक्क उमेदवार जाहीर करण्याअगोदरच ‘एबी’ फॉर्मचे वाटप केले आहे. यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार यांनी उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप केले आहे. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत 17 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.
राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच अजित पवारांकडून एबी फॉर्मचे वाटप केले जात असून भरत गावित आणि हिरामण खोसकर यांच्यासह 15 जणांना अर्ज मिळाले आहेत.
‘एबी’ फॉर्म वाटप केलेल्यामध्ये राजेश विटेकर, संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, दौलत दरोडा, राजेश पाटील, दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, भरत गावित, बाबासाहेब पाटील, अतुल बेनके यांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप केले आहे.