वायफळे खून प्रकरणातील आणखी एकाला ठोकल्या बेड्या

तासगावच्या डीबी पथकाची कारवाई : आतापर्यंत सहा आरोपी गजाआड
माणदेश एक्सप्रेस न्युज
तासगाव : तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी आणखी एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुणे येथे भारती विद्यापीठ परिसरात ही कारवाई केली. विकास उर्फ सोन्या गंगाराम राठोड (वय 23, मूळ रा. अक्कलकोट दिघेवाडी, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या खुनप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना गजाआड करण्यात आले आहे.
या खुनप्रकरणी आतापर्यंत मुख्य संशयित आरोपी विशाल सज्जन फाळके यांच्यासह अनिकेत संतोष खुळे (वय 19, रा. कात्रज, पुणे), आकाश महिपत मळेकर (वय 20, रा. पापळ वस्ती, बिबेवाडी), गणेश प्रकाश मळेकर (वय 21, रा. मांगडेवाडी, कात्रज, मूळ गाव मळे, ता. भोर, जि. पुणे) या चार आरोपींसह एक अल्पवयीन आरोपी जेरबंद करण्यात आला होता. तर विकास राठोड या सहाव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत माहिती अशी : वायफळे (ता. तासगाव) येथील विशाल फाळके व संजय फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होते. याच वादातून अनेकवेळा खुनी हल्ले, मारामाऱ्या झाल्या आहेत. यातूनच विशाल फाळके याने 12 डिसेंबर 2024 रोजी पुणे येथून आपली टोळी आणून संजय फाळके कुटुंबावर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात संजय फाळके, जयश्री फाळके, रोहित फाळके, आशिष साठे, आदित्य साठे व सिकंदर शिकलगार हे गंभीर जखमी झाले होते. यातील रोहित फाळके याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर जखमींवर उपचार करण्यात आले.
याप्रकरणी आतापर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने पाच आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान, या खून प्रकरणातील विकास उर्फ सोन्या राठोड हा सहावा आरोपी पुणे येथे भारती विद्यापीठ परिसरात असल्याचे माहिती तासगावच्या डीबी पथकाला मिळाली.
या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, पोलीस हवालदार अमोल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव यांनी भारती विद्यापीठ परिसरात सापळा रचला. याठिकाणी विकास राठोड येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.