आटपाडी शहरामध्ये जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत ; आठवडी बाजारावर होणार परिणाम
पावसामुळे आटपाडी तालुक्यातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : भारतीय हवामान विभागाने (IMD) कालपासून पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी अत्यंत मुसळधार पावसासह अति मुसळधार पावसाची शक्यता असून आटपाडी शहरामध्ये काल सायंकाळी व आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.
गेली दोन दिवस पावसाचा ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे काल पासून आटपाडी शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. मात्र आजपासून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. पावसामुळे आटपाडी तालुक्यातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
आटपाडी शहरामध्ये आज आठवडी बाजार व शेळी-मेंढी बाजार असल्याने बाजारावर याचा मोठा परिणाम होणार आहे. आठवडी बाजारात व्यापाऱ्यांना आपले दुकान लावण्यास पावसामुळे अडथळा निर्माण झाला आहे. मोठ्या हिमतीने पिकवलेल्या भाजीपाला विकणे मुश्कील होणार आहे.
तालुक्यातून शेळ्या-मेंढ्या विक्रीस घेवून येणाऱ्या शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. तर आज सकाळच्या सत्रात शाळा असल्याने अनेक विद्यार्थी शाळेपासून वंचित राहिले आहेत. संपूर्ण दिवसभर पावसाने वातावरण राहण्याची शक्यता आहे.