घानवडच्या माजी उपसरपंचांच्या खून प्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात ; अनैतिक संबंधातून खून झाल्याची चर्चा
गार्डी गावच्या हद्दीत नेवरी रस्त्यावर चव्हाण यांचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.
माणदेश एक्सप्रेस न्युज : खानापूर : खानापूर तालुक्यातील घानवड येथील माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. या खूनप्रकरणी यापूर्वीच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
विशाल बाळासो मदने (वय २३), सचिन शिवाजी थोरात (वय २५, दोघेही रा. घानवड, ता. खानापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुवार दि. ५ रोजी दुपारी घानवडचे माजी उपसरपंच बापूराव चव्हाण त्यांच्या बुलेटवरून पोल्ट्री फार्मकॅडे निघाले होते. त्यावेळी गार्डी गावच्या हद्दीत नेवरी रस्त्यावर चव्हाण यांचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. हा खून मदने आणि थोरात यांनी केल्याचेही स्पष्ट झाले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते.
त्यांच्या शोधासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथक त्यांचा शोध घेत असताना पथकातील उदय साळुंखे यांना दोघेही संशयित पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी येथील पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचली होते. दोघेही तेथे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडेही कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून चव्हाण याचा खून केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, विट्याचे निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, उदय साळुंखे, हणमंत् लोहार, प्रमोद साखरपे, हेमंत तांबेवाघ, अमोल कराळे, उत्तम माळी, अक्षय जगदाळे, महेश देशमुख, महेश संकपाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.