आटपाडी : माडगुळे येथील पर्यायी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद
आटपाडी तालूक्यात गेली दोन दिवस झाले दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथे आटपाडी-सांगोला या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या ओढ्यावरील पुलाचे काम सुरु असून पर्यायी रस्त्यावर पावसाचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून, माडगुळेहून सांगोला कडे जाणारी एस.टी. ची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
आटपाडी तालूक्यात गेली दोन दिवस झाले दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे तालुक्यातील बहुतांश गाव ओढ्यांना पाणी आले आहे. काही ठिकाणी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
माडगुळे येथे आटपाडी-सांगोला या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या ओढ्यावरील पुलाचे काम सुरु आहे. या ठिकाणी काल झालेल्या पावसाने या ओढ्याला मोठ्या प्रमाणत पाणी आले. पुलाचे काम अपूर्ण असल्याने या ठिकाणी वाहनांना जाण्यासाठी पर्यायी रस्ता ठेकेदाराकडून करण्यात आला होता. परंतु पाण्याच्या प्रवाहाने हा रस्ता खचून गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सध्या तरी पुलाचे काम अपूर्ण असल्याने याठिकाणहून होणारी वाहतूक बंद असल्याने याचा मोठा फटका वाहनधारकांना बसत असून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी वाहनधारक करत आहेत.