आटपाडी शहरातील स्मशानभूमीला ना पाणी ना लाईट – चंद्रकांत दौंडे यांनी दिला खणखणीत इशारा!
स्मशानभूमीत पाणी, लाईट नाही; तीन वर्षात कर वाढला पण सुविधा शून्य

आटपाडी (माणदेश एक्सप्रेस न्यूज) : आटपाडी नगरपंचायतीला तीन वर्षे पूर्ण होत आली, मात्र शहरातील स्मशानभूमीत अजूनही मूलभूत सुविधा नाहीत. अंघोळीचे पाणी नाही, लाईटची सोय नाही, आणि स्वच्छतागृहांचा पत्ताच नाही. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासनाने या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
या स्मशानभूमीत शहरातील सुमारे ७० टक्के लोकांचे अंत्यविधी केले जातात. यामध्ये बौद्ध, होलार, ढोर, कोष्टी, माळी, साळी, मातंग, जैन, धनगर अशा विविध समाज घटकांचा समावेश आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त करत भाजप नेते चंद्रकांत दौंडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर लवकरात लवकर स्मशानभूमीत पाणी, लाईट आणि इतर सुविधा उपलब्ध केल्या नाहीत, तर येणाऱ्या मार्च महिन्यात कर वसुलीसाठी नगरपंचायतीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना वॉर्डात फिरकू सुद्धा देणार नाही.”
दौंडे यांनी प्रशासनावर जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोप करत सांगितले की, “शहरवासियांनी तीन वर्षांत कर रुपाने दुप्पट-तिप्पट रक्कम दिली आहे. मात्र त्याच्या बदल्यात नागरिकांच्या अंतिम प्रवासासाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधांचाही अभाव आहे, ही बाब दुर्दैवी आहे.”
स्मशानभूमीतील ही स्थिती पाहता प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून पाणीपुरवठा, वीज व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी नागरिकांचीही मागणी आहे. अन्यथा येणाऱ्या काळात संतप्त जनतेचा रोष नगरपंचायतीच्या विरोधात उफाळून येऊ शकतो.