‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट आहे’- अमृता फडणवीस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना देखील ही योजना का राबवली जात आहे, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. त्यासोबत ही योजना फक्त विधानसभा निवडणुकीपर्यंतच सुरु राहणर असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. आता या योजनेवर अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे. श्रावण सरी आणि मंगळागौर या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट आहे. हे पैसे महिलांच्या बचत खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या पैशांमुळे त्यांची छोटी मोठी गरज असेल त्याला हातभार लागावा, अशीच सरकारची इच्छा आहे. तसेच स्टंटमॅन लोकांनी कोण काय करतंय हे सांगायची गरज नाही. ही योजना सर्वसामान्य महिलांसाठी आहे. त्यामुळे स्टंटमॅन लोकांनी हे स्टंट सुरू आहेत, असे सांगण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली.
लाडकी बहीण योजना नक्की काय?
महिलांच्या सक्षमीकरता आणि आर्थिक सहाय्याकरिता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. 1 जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. या योजनेतंर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट नसून या अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.