आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. १२ मधून भाजपचे महेश देशमुख विजयी

आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालात प्रभाग क्रमांक १२ मधून भारतीय जनता पक्ष (भाजप) चे उमेदवार महेश आप्पासो देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आज (दि. २१) आटपाडी तहसील कार्यालय येथे पार पडलेल्या मतमोजणीत महेश देशमुख यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत विजय संपादन केला. त्यांच्या विजयानंतर परिसरात समर्थकांकडून जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
या प्रभागात यावेळी सरळ लढत पाहायला मिळाली. भाजपकडून महेश आप्पासो देशमुख, तर शिवसेना कडून डॉ. विनय जयराम पतकी यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. मतमोजणीअंती भाजपचे महेश देशमुख यांना एकूण ६३४ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार डॉ. विनय पतकी यांना ३३८ मते प्राप्त झाली. तसेच NOTA ला ८ मते नोंदवली गेली. या निकालावरून महेश देशमुख यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये प्रचाराच्या काळात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था तसेच मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न केंद्रस्थानी होते. महेश देशमुख यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाभिमुख मुद्द्यांवर भर दिला होता. याच मुद्द्यांना मतदारांनी पसंती दिल्याचे निकालावरून दिसून येते. विशेषतः युवक व महिला मतदारांचा कल भाजपकडे झुकलेला दिसला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना महेश देशमुख यांनी मतदारांचे आभार मानले. “प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पारदर्शक कारभार, विकासकामांना गती आणि सर्व घटकांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा निर्धार आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच विरोधी उमेदवारांनी शांततेत निकाल स्वीकारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, या विजयामुळे आटपाडी नगरपंचायतीतील भाजपची ताकद वाढली असून, आगामी नगरपंचायतीच्या कारभारात भाजपची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




