आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. ६ मधून भाजपचे ऋषिकेश देशमुख यांचा दणदणीत विजय

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल आज जाहीर झाला असून, प्रभाग क्रमांक ६ मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ऋषिकेश बाळासो देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. देशमुख यांनी ९५९ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली. त्यांच्या या विजयामुळे प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.
या प्रभागात यावेळी चुरशीची लढत अपेक्षित असताना निकालाने मात्र स्पष्ट कल दाखवला. शिवसेना कडून निवडणूक लढवणारे ब्रम्हदेव केशव देशमुख यांना ४२१ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून उमेदवार असलेल्या सदानंद बाबा खरात यांना अवघी १३ मते मिळाली. NOTA ला ३ मते नोंदवली गेली.
मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत ऋषिकेश देशमुख यांची आघाडी सातत्याने वाढत गेली. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजयाचा जल्लोष करण्यात आला. अनेक नागरिकांनी देशमुख यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
विजयानंतर बोलताना ऋषिकेश बाळासो देशमुख यांनी मतदारांचे आभार मानले. “प्रभागातील विकासकामे, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न केला जाईल. मतदारांनी दाखवलेला विश्वास हा जबाबदारी वाढवणारा आहे,” असे त्यांनी सांगितले. या निकालामुळे आटपाडी नगरपंचायतीच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.




