आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. ५ मधून शिवसेनेचे संतोषकुमार लांडगे यांचा विजय

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (दि. २१) आटपाडी तहसीलदार कार्यालय येथे पार पडली. या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ५ मधून शिवसेनेचे उमेदवार संतोषकुमार सर्जेराव लांडगे यांनी मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या विजयानंतर परिसरात समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये यावेळी चौरंगी लढत रंगली होती. शिवसेनेचे संतोषकुमार सर्जेराव लांडगे यांना ४४८ मते मिळाली. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे उमेदवार नाथा शामू लांडगे यांनी ४०५ मते मिळवत कडवी झुंज दिली. मात्र अखेरीस त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या क्रमांकावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे रवींद्र दत्तू लांडगे असून त्यांना ५८ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार संतोष सरतापे यांना २९ मते मिळाली.
विजयानंतर संतोषकुमार लांडगे यांनी मतदारांचे आभार मानत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी मूलभूत सुविधा या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.




