आटपाडीत आज देशमुख गटाची बैठक ; अमरसिंह देशमुख काय निर्णय घेणार याकडे मतदार संघाचे लक्ष
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे आज दिनांक ०८ रोजी सकाळी १०.०० देशमुख गटाची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे कोणता निर्णय घेणार? याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे.
माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे राजेंद्रआण्णा देशमुख हे ‘तुतारी’ चिन्हावर लढणार असल्याचे फिक्स झाले होते. परंतु विट्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करत, उमेदवारी खेचून आणली.
आटपाडी येथे राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या गटाचा मेळावा सूतगिरणी येथे संपन्न झाला. यामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांनी राजेंद्रआण्णा देशमुख यांना अपक्ष लढण्याची विनंती केली होती. परंतु बैठकीत अमरसिंह देशमुख यांनी मात्र, मी भाजपमध्येच आहे असे सांगितल्याने, मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यांनी जो मला साखर कारखाना चालू करण्यास मदत करेल त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका त्यांनी त्यावेळी झालेल्या बैठकीमध्ये घेतली होती. बैठकीनंतर त्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.
त्याच पार्श्वभूमीवर आज आटपाडी येथील सूतगिरणी येथे देशमुख गटाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये अमरसिंह देशमुख हे कोणती भूमिका जाहीर करणार, कोणाला पाठींबा देणार? यावर मतदार संघाचे लक्ष लागून रहिले आहे.