आटपाडी : खरसुंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे “ग्रामीण रुग्णालयात” रुपांतर
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे मतदार संघातील आरोग्य यंत्रणा मजबूत

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर आता “ग्रामीण रुग्णालयात” झाले असून याबाबत आज शासनाचा आदेश प्राप्त झाला असल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे मतदार संघातील आरोग्य यंत्रणा बळकट झाली असून याचा लाभ खरसुंडी परिसरातील नागरिकांना होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, खरसुंडी, ता. आटपाडी, जि. सांगली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन होणे हा आरोग्य सुविधांच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या शासन निर्णयाने “विशेष बाब” म्हणून मान्यता दिली जाणे म्हणजे स्थानिक आरोग्यसेवांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. यामुळे खरसुंडी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, तसेच मोठ्या शहरी रुग्णालयांवर अवलंबित्व कमी होईल. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा विस्तार हा आरोग्य सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो या निर्णयाने साध्य होणार आहे.
खरसुंडी येथे या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले असून, आमदार गोपीचंद पडळकर यांचे आभार मानत, फटाके फोडत आनंद साजरा केला. यावेळी सरपंच धोंडीराम इंगवले, राहुल गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.