बारामतीत पवार कुटुंबात लग्नसराई! युगेंद्र पवार यांचा साखरपुडा, सुप्रिया सुळे यांची खास पोस्ट चर्चेत
अजित पवारांच्या पुतण्या युगेंद्र पवार यांचा तनिष्कासोबत साखरपुडा; पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का, चर्चांना उधाण

बारामतीतील पवार कुटुंबात सध्या लग्नसराईचे वातावरण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे युवा चेहरा युगेंद्र पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचवली.
“सर्वात आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे. माझा भाचा युगेनचा साखरपुडा सुंदर तनिष्काशी झाला आहे! त्यांना आयुष्यभर भरपूर प्रेम आणि आनंद मिळो ही प्रार्थना. कुटुंबात तनिष्काचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे!” अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
या खास पोस्टसोबत त्यांनी युगेंद्र आणि तनिष्काच्या साखरपुड्याचे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपून शेअर केले, आणि पाहता पाहता ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र असून, बारामतीच्या राजकारणात त्यांचे वेगळे स्थान आहे. २२ एप्रिल १९९१ रोजी जन्मलेल्या युगेंद्र यांनी अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी येथून फायनान्स आणि इन्शुरन्स विषयात पदवी संपादन केली आहे. सध्या ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.
त्याचबरोबर ते विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार असून, सामाजिक कामातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ओढा खोलीकरण, विहिरी बांधून देणं, वनीकरण अशा विविध उपक्रमातून शेतकऱ्यांशी त्यांची घट्ट नाळ जोडलेली आहे. कुस्ती प्रेमींसाठीही युगेंद्र एक ओळखीचं नाव आहेत, कारण ते बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत.
पवार कुटुंब एकत्र येणार का?
यापूर्वी १० एप्रिल रोजी अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा पुण्यात पार पडला होता. सोशल मीडिया कंपनीचे प्रमुख प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील हिच्याशी जय यांचा साखरपुडा झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते, आणि त्यावेळीही माध्यमांमध्ये ही बाब चर्चेचा विषय ठरली होती.
आता युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या निमित्तानेही पवार घराणं पुन्हा एकत्र येणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण गेल्या काही काळात राजकीय मतभेदांमुळे पवार कुटुंबात फूट पडल्याचं चित्र अनेकदा पाहायला मिळालं.
पवार कुटुंबातील पुढच्या पिढीचे वैवाहिक सोहळे राजकीय वर्तुळात जितके कौटुंबिक आनंदाचे क्षण ठरतात, तितकेच ते महाराष्ट्राच्या राजकारणातील संभाव्य समीकरणांचे संकेत देणारेही असतात. युगेंद्र पवार यांचा साखरपुडा ही अशीच एक घटना ठरली आहे, जिच्या निमित्ताने साऱ्यांच्या नजरा बारामतीकडे वळल्या आहेत.



