‘खोके सरकारने या गोष्टीची सुपारी घेतली आहे’; उद्धव ठाकरे भडकले
“खोके सरकारने जणू काही मुंबई विकायला काढली आहे. मुंबईकर हद्दपार झाला पाहिजे, याची सुपारी यांनी घेतली आहे. ज्याची गरज नाही ते आमच्या डोक्यावर लादताय आणि आमच्या हक्काची जी मराठी माणसं त्यांना तुम्ही मिठागरात फेकून देणार, मी हे अजिबात होऊ देणार नाही”, असे विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत आर. सी. एफ च्या कर्मचारी सेनेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
मुंबईत आर.सी.एफ कर्मचारी सेनेचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. या भाषणावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांचे होणारे स्थलांतर आणि केंद्र-राज्य सरकारकडून सुरु असलेल्या खासगीकरणावर भाष्य केले. निवडणुकीपूर्वी कार्यक्रम घ्यायचा होता. पण कुणी काय तंगडंमध्ये टाकलं माहीत आहे. पण त्याला आपण आडवं केलं आहे. आपल्या वाट्याला जो येतो, त्याचं काय होतं हे सर्वांना माहीत आहे. त्याने आपल्या वाटेला जाऊ नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी हे अजिबात होऊ देणार नाही
वांद्रे कुर्ल्यातील मोक्याचा भूखंड जिथे आपण कोव्हिड सेंटर उभं केलं होतं तो भूखंड दिल्लीच्या मालकाला भूखंड दिला. बुलेट ट्रेनसाठी मुंबईतील भूखंड देऊन टाकला. बुलेट ट्रेनचा तुम्हाला किती उपयोग आहे, तुम्ही तिथे रोज पाफडा, शेव किंवा ढोकळा खायला जाणार आहात का? ज्याची गरज नाही ते आमच्या डोक्यावर लादताय आणि आमच्या हक्काची जी मराठी माणसं त्यांना तुम्ही मिठागरात फेकून देणार, मी हे अजिबात होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.