सांगली : “उद्याच्या” सुट्टी बाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आदेश जारी
दि. 16 सप्टेंबर 2024 रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली जिल्ह्यात यापूर्वी अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ईद-ए-मिलाद निमित्त सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2024 रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
उप सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेवून सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असे नमूद आहे.
पोलीस अधीक्षक सांगली यांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या अहवालामध्ये ईद-ए-मिलाद निमित्त दि. 16 सप्टेंबर रोजी 11 मिरवणुका, दि. 18 सप्टेंबर रोजी एक मिरवणूक व दि. 19 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यात एकूण 8 मुख्य मिरवणुका आहेत. शासन अधिसूचनेमध्ये 19 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत नमूद नाही. ही वस्तुस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. 16 सप्टेंबर 2024 रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश जारी केले आहेत.