मुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाकार; बंधारे पाण्याखाली, घरे कोसळली, वाहतूक ठप्प

कोल्हापूर | प्रतिनिधी :
मागील दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा आदी तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आल्याने प्रति सेकंद तब्बल ११,५०० घनफूट पाणी विसर्ग केला जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व धरणांतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीची पातळी ३६ फूटांवर पोहोचली असून, ती धोका रेषेजवळ आली आहे.
यामुळे जिल्ह्यातील तब्बल ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक प्रमुख मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाट मार्गात दरड कोसळल्याने संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागात घरांची पडझड, शेतीचे नुकसान आणि विजेच्या पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.
गगनबावड्यातील बंधारे पाण्याखाली, संपर्क तुटला
गगनबावडा तालुक्यातील कुंभी व सरस्वती नद्यांना पूर आला आहे. वेतवडे, मांडुकली, शेणवडे व असळज येथील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. तिसंगी पैकी टेकवाडी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. कोदे, अणदूर व वेसरफ हे लघुप्रकल्प शंभर टक्के भरले असून कुंभी धरणातून तब्बल १६१० क्युसेक विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे.
तीन घरे कोसळली; लाखोंचे नुकसान
पावसामुळे घरांची पडझडही सुरू झाली आहे.
-
कोदे बुद्रुक येथील बाळाबाई संकपाळ यांच्या घराची खोली कोसळली. सुदैवाने कुटुंबीय शेतात असल्याने जीवितहानी टळली. मात्र, घरगुती साहित्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
-
मांडुकली येथील विष्णू कांबळे यांच्या घराचे छत कोसळले.
-
सैतवडे येथील कृष्णात हाप्पे यांच्या राहत्या घराचे छप्पर कोसळले.
ग्रामीण भागात कच्ची घरे पावसाच्या तडाख्याने हादरू लागली आहेत. नागरिकांनी शासकीय मदतीची मागणी केली आहे.
पिरळ पूल पाण्याखाली; शेतीचे प्रचंड नुकसान
राधानगरी धरणाच्या विसर्गामुळे भोगावती नदीला या वर्षी तिसऱ्यांदा पूर आला आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडून पिरळ येथील पुलावर आले आहे. परिणामी राधानगरीकडे जाणारी वाहतूक कसबा तारळे मार्गे वळविण्यात आली आहे. नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्याने ऊस, भात व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतेत असून त्यांना शासनाकडून तातडीने पंचनामे करण्याची मागणी आहे.
शिरोळ तालुक्यात नदीचे पाणी दत्त मंदिरापर्यंत
सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पावसामुळे शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिरापर्यंत नदीचे पाणी पोहोचले आहे. दत्तवाड-एकसंबा व दत्तवाड-मलिकवाड हे बंधारे पाण्याखाली गेल्याने मार्ग बंद झाला आहे. यावर्षी पाचव्यांदा या भागातील बंधारे पाण्याखाली गेले असून स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
गडहिंग्लजात हिरण्यकेशी नदीला पूर
गडहिंग्लज तालुक्यात जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीवरील निलजी व ऐनापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव पूल पाण्याखाली जाण्याची भीती आहे. आजरा व आंबोली परिसरातील मुसळधार पावसामुळे नदी पात्राबाहेर पडली असून, पाटबंधारे विभागाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
करवीर तालुक्यात सात बंधारे पाण्याखाली, शेतकऱ्यांचा संताप
करवीर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यात राजाराम, शिंगणापूर, कोगे खडक, बहिरेश्वर-कोगे, सांगरूळ, आरे, वरणगे-चिखली या बंधाऱ्यांचा समावेश आहे.
शिंगणापूर बंधाऱ्याचे बरगे वेळेत काढले जात नसल्याने दरवर्षी पाणीपातळी वाढते आणि नदीकाठची शेती पाण्याखाली जाते. ऊस पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
वीज व वाहतूक व्यवस्था कोलमडली
पूरामुळे जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर पाणी आल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. घाटमाथ्यावर दरडी कोसळल्याने संपर्क तुटला आहे. शिवाय, वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे अनेक गावांमध्ये अंधार पसरला आहे.
पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता
पावसाची संततधार अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन सतर्क असून नदीकाठच्या गावांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर असून बचाव पथके सज्ज ठेवली आहेत.