Video : आटपाडी आगाराच्या महिला अधिकाऱ्याची मुजोरी ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पास घेऊन गाठले घर : पालकांनी कवठेएकंद येथे अडवली बस
तासगाव : आटपाडी आगाराच्या एका महिला अधिकाऱ्याचा मस्तवालपणा चव्हाट्यावर आला आहे. या अधिकाऱ्याला बसमधून उतरण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागा दिली नसल्याचा राग मनात धरून या अधिकाऱ्याने चक्क विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पास काढून घेतले. हे पास घेऊन या अधिकाऱ्याने आपले घर गाठले. त्यानंतर या बसमधील वाहकाने संबंधित विद्यार्थ्यांना तिकीट काढायला लावले. विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी कवठेएकंद येथे दोन तास आटपाडी – सांगली ही बस अडवून ठेवली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. याप्रकरणी संबंधित वादग्रस्त महिला अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी : संबंधित महिला अधिकारी मुळची तासगाव तालुक्यातील आहे. ती नोकरीला लागल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्यावर निलंबनाचीही कारवाई झाली होती. तिच्याविरोधात आजपर्यंत अनेक तक्रारी झाल्या आहेत. वरिष्ठांकडून तिची अनेकवेळा चौकशी झाली आहे. तिला बऱ्याचवेळा कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. सुरुवातीपासूनच ही महिला अधिकारी वादग्रस्त ठरली आहे.
ही महिला सांगली येथे विभागीय कार्यालयात काम करत होती. तिथेही तिच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी होत्या. अनेकवेळा चौकशी आणि नोटिसा मिळूनही या अधिकाऱ्याच्या वर्तनात, कामकाजात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या माथ्यावर वादग्रस्त असा शिक्का पडला आहे. जिथे – जिथे नोकरीला जाईल तिथे – तिथे तिच्यावर हा शिक्का कायम असतो. सांगली येथे विभागीय कार्यालयात वादग्रस्त ठरल्यानंतर या महिला अधिकाऱ्याची काही महिन्यांपूर्वी आटपाडी आगारात बदली झाली आहे.
आटपाडी आगारात काम करतानाही या अधिकाऱ्याच्या कामकाजात बदल झाला नाही. ‘सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही’, अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे निलंबनाची कारवाई होऊन तसेच अनेक चौकश्या, नोटिसा येऊनही या अधिकाऱ्याच्या कामकाजात बदल झाला नाही. ही अधिकारी आज आटपाडी आगाराच्या आटपाडी – सांगली (एम. एच. 10, डिटी. 3859) या बसने तासगावला आली. सायंकाळी 4.45 च्या दरम्यान ही बस तासगाव स्टँडवर आली. त्यावेळी कवठेएकंद, कुमठे फाटा या भागात जाणाऱ्या अनेक प्रवासी, विद्यार्थ्यांनी बसजवळ गर्दी केली.
दरम्यान, गर्दीमुळे संबंधित अधिकाऱ्याला बसमधून उतरताना जागा मिळाली नाही. ही अधिकारी खाली उतरत असताना प्रवासी व विद्यार्थ्यांनी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडासा गोंधळ, ढकलाढकली झाली. या प्रकारचा संबंधित महिला अधिकाऱ्याला प्रचंड राग आला. कशीबशी ही अधिकारी खाली उतरली. मात्र विद्यार्थी व प्रवाशांनी आपणाला बसमधून उतरायला जागा दिली नाही या कारणाने संबंधित अधिकाऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
त्यानंतर सगळे प्रवाशी व विद्यार्थी बसमध्ये बसल्यानंतर संबंधित अधिकारी पुन्हा बसमध्ये चढली. ‘मी तिकीट चेकर आहे. मला तुमचे पास दाखवा’, असे म्हणून या अधिकाऱ्याने जवळजवळ 15 ते 20 विद्यार्थ्यांचे पास बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले. हे पास घेऊन या अधिकाऱ्याने चक्क आपले घर गाठले. त्यानंतर ही बस तासगाव स्टँडवरून निघाली. यावेळी विद्यार्थ्यांनी बसमधील वाहकाला कोणीतरी आमचे पास घेऊन गेल्याचे सांगितले. मात्र या वाहकाला पास घेऊन जाणारी महिला अधिकारी कोण आहे, हे माहीत असतानाही तो मूग गिळून गप्प बसला. तुमचे पास कोणी काढून घेतले आहेत, हे मला माहित नाही. तुम्ही तिकीट काढा, अशी तंबी या वाहकाने विद्यार्थ्यांना दिली.
दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना तिकीट काढता येत नव्हती. परिणामी गोंधळ झाला. या गोंधळातच काही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना फोन करून सांगितले. त्यामुळे पालकांनी कवठेएकंद येथे ही बस अडवली. आमच्या मुलांचे पास ज्या अधिकाऱ्याने काढून घेतले आहेत त्यांना इथे बोलवा. विद्यार्थ्यांचे पास परत द्या. त्याशिवाय बस सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. दरम्यान, बस अडवल्यानंतरही निर्ढावलेली संबंधित महिला अधिकारी कवठेएकंद येथे यायला तयार नव्हती. त्यामुळे पालक आणखीणच आक्रमक झाले.
याठिकाणी पालकांनी तब्बल दोन तास बस अडवून धरली. दरम्यान, तणाव निर्माण होऊ लागल्याने आमदार सुमन पाटील व माजी खासदार संजय पाटील यांच्या कार्यालयातून सबंधित महिला अधिकाऱ्याला फोन गेले. त्यानंतर नरमाईची भूमिका घेऊन ही अधिकारी तब्बल दोन तासांनी कवठेएकंद येथे गेली. त्याठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे पास घेतले होते त्यांना परत करण्यात आले. याठिकाणी पालकांनी या अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. दरम्यान, या अधिकाऱ्याच्या मुजोर वागण्यामुळे प्रवाशी, विद्यार्थी व पालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. (स्त्रोत jantandav)