लोकसभा निवडणुकीत NCP ला फटका बसलेल्या ‘पिपाणी’ चिन्हाबाबत आयोगाचे महत्त्वाचे ‘हे’ आदेश
माणदेश एक्स्प्रेस न्यूज : नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह घेऊन 10 पैकी तब्बल 8 जागा जिंकल्या. मात्र, या निवडणुकीत ‘तुतारी’ आणि ‘पिपाणी’या चिन्हांमुळे पवारांच्या पक्षाला मोठा फटका बसल्याचं दिसून आलं.त्यानंतर पवारांच्या पक्षाकडून पिपाणी हे चिन्ह गोठवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जोरदार प्रयत्न केले.
पण विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवण्यास नकार दिला होता.आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ चिन्हाबाबत नवे सुधारित आदेश दिले आहेत. हे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पिपाणी चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण आदेश एका परिपत्रकाद्वारे दिले. त्यात तयार केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीमधील ‘Trumpet’ या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरण ‘तुतारी’ ऐवजी ‘ट्रम्पेट’ असे सुधारित करण्यात येत आहे. या संदर्भात निवडणूक चिन्हांचा तक्ता PDF मध्ये आपणांस उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करते वेळी व अन्य आवश्यक प्रयोजनासाठी सुधारित तक्त्यामध्ये नमूद केल्यानुसार ‘ट्रम्पेट’ मुक्त चिन्हाचे मराठी नाव तुतारी ऐवजी ‘ट्रम्पेट’ असे दर्शविण्यात यावे असा महत्त्वपूर्ण आदेश निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकात दिला आहे.