आटपाडीताज्या बातम्या

आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. १७ मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मीनाक्षी पाटील विजयी

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीदरम्यान प्रभाग क्रमांक १७ मधील निकाल अत्यंत चुरशीचा ठरला. या प्रभागातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार मीनाक्षी मनोजकुमार पाटील यांनी अवघ्या तीन मतांच्या फरकाने विजय मिळवून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. मीनाक्षी पाटील यांना ३८८ मते मिळाली, तर भाजपच्या अक्काताई आप्पासो मरगळे यांना ३८५ मते मिळाली. शिवसेनेच्या रुपाली मनोहर मरगळे यांनी २७९ मते मिळवली. विशेष म्हणजे या प्रभागात NOTA ला ६ मते मिळाल्याने ‘एकाही उमेदवाराला नाही’ हा मतदारांचा संदेशही ठळकपणे पुढे आला.

अवघ्या तीन मतांनी निकाल ठरल्याने मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेवटच्या टेबलवरील आकडे स्पष्ट होताच समर्थकांमध्ये जल्लोष उसळला, तर प्रतिस्पर्धी गोटात शांतता पसरली. या निकालात NOTA ला मिळालेली सहा मते निर्णायक ठरल्याची चर्चा रंगली असून, विजयी आणि पराभूत उमेदवारांना मिळालेल्या श्रेयात NOTA चा वाटाही तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे.

विजयी झालेल्या मीनाक्षी पाटील या पाणी चळवळीचे नेते आनंदरावबापू पाटील यांच्या सुनबाई असून, सामाजिक कार्याचा वारसा त्यांना लाभला आहे. प्रचारादरम्यान पाणीपुरवठा, नागरी सुविधा, स्वच्छता, रस्ते आणि मूलभूत सेवांवर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या या मुद्देसूद प्रचाराला मतदारांनी पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

निकालानंतर मीनाक्षी पाटील यांनी मतदारांचे आभार मानत, “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे. प्रभागातील पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि विकासकामांना प्राधान्य देऊन सर्वसमावेशक कारभार करू,” अशी ग्वाही दिली. अत्यंत चुरशीच्या लढतीतून मिळालेला हा विजय प्रभाग क्र. १७ च्या राजकारणात पुढील काळात दिशा ठरवणारा ठरेल, असे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button