आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. १३ मधून भाजपचे पै. अजित जाधव विजयी

आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक १३ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पै. अजित शिवाजी जाधव यांनी विजय मिळवला आहे. आज (दि. २१) तहसील कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत पै. अजित जाधव यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेत विजयी मुसंडी मारली. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून फटाके फोडून व एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करण्यात आला.
प्रभाग क्रमांक १३ साठी यावेळी चौरंगी लढत रंगली होती. भाजपकडून पै. अजित शिवाजी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसकडून यल्लापा हणमंत पवार, शिवसेनेकडून दत्तात्रय ज्ञानू जाधव तर अपक्ष उमेदवार म्हणून गणेश प्रभाकर माने यांनी निवडणूक लढवली होती. मतमोजणीअंती भाजपचे पै. अजित जाधव यांना एकूण ३१५ मते मिळाली. त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे यल्लापा पवार यांना २६० मते, शिवसेनेचे दत्तात्रय जाधव यांना १४९ मते, तर अपक्ष उमेदवार गणेश माने यांना २७ मते मिळाली. NOTA ला २ मते नोंदवली गेली.
संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि कडेकोट बंदोबस्तात पार पडली. या निकालामुळे प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपचे वर्चस्व अधोरेखित झाले असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विजयानंतर बोलताना पै. अजित जाधव यांनी मतदारांचे आभार मानत, “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम केले जाईल,” असे सांगितले. त्यांच्या विजयाने आटपाडी नगरपंचायतीच्या राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.




