सांगली महानगरपालिकेसाठी सत्ता संघर्ष तीव्र; माजी महापौरासह १५ नगरसेवक अजित पवार गटात जाणार

सांगली | महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सांगली महापालिकेसाठी महाविकास आघाडीची युती म्हणून लढण्याची घोषणा केली. या घोषणेला काहीच तास झाले असतानाच सांगलीच्या राजकारणात नवा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
सांगली–मिरज–कुपवाड महापालिका क्षेत्रातील पंधराहून अधिक माजी नगरसेवकांनी सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. पक्षप्रवेशाबाबत या बैठकीत अंतिम चर्चा होऊन शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय माहिती मिळते आहे. लवकरच मिरजेत या १५ माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) औपचारिक प्रवेश होणार असल्याचे सांगितले जाते.
अजित पवार यांच्या भेटीदरम्यान आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पद्माकर जगदाळे उपस्थित होते. या माजी नगरसेवकांमध्ये भाजप, काँग्रेस तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रभावी नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या माजी महापौरासह काही बड्या नगरसेवकांचाही यात समावेश असल्याचे समजते.
जयंत पाटील यांच्या युती घोषणेनंतर काही तासांतच घडलेल्या या घडामोडींमुळे सांगली महापालिका निवडणुकीत नव्या राजकीय गणितांना सुरुवात झाली आहे. एकीकडे महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या तयारीत असतानाच, दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये माजी नगरसेवकांची वाढती चळवळ ही आगामी निवडणुकीत शक्तीसंतुलन बदलण्याची चिन्हे मानली जात आहेत.
सांगलीच्या राजकारणात अचानक आलेल्या या हालचालींमुळे स्थानिक पातळीवर नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत अधिक नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




