आटपाडी नगरपंचायतचा कारभार अनागोंदी : दिवसा पथदिवे सुरू
नगरपंचायतीचा कारभार : हसावं की रडावं!

आटपाडी (प्रतिनिधी) : आटपाडी नगरपंचायतीचा कारभार किती बेफिकीर व अनागोंदी पद्धतीने चालतो याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले आहे. शहरातील कोष्टी गल्ली परिसरामध्ये लावलेले पथदिवे दिवसा सुरू असल्याचे चित्र समोर आले असून यामुळे नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या पैशांतून वीजबिल भरले जाते. परंतु दिवसा पथदिवे सुरू ठेवून नगरपंचायत सरळसरळ सार्वजनिक पैशांची नासाडी करत आहे. वीज बचत मोहीम, ऊर्जा संवर्धन याबाबत मोठमोठी भाषणे केली जातात, पण प्रत्यक्षात मात्र नगरपंचायतीकडूनच वीज वाया घालवली जाते, ही बाब नागरिकांना चांगलीच खटकत आहे.
स्थानिक रहिवाशांनी याबाबत “नगरपंचायतीने तात्काळ लक्ष घालून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी” अशी मागणी केली आहे. कोष्टी गल्लीसह शहरातील अन्य भागातही असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात असून नगरपंचायत प्रशासनाने तातडीने तपासणी करून योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कोष्टी गल्लीतील नागरिकांनी यासंबंधी रोष व्यक्त केला आहे. “दिवसा पथदिवे लावणे म्हणजे सरळसरळ करदात्यांच्या पैशांचा अपव्यय. आधीच नगरपंचायत आर्थिक अडचणीत आहे, मग असा कारभार कसा चालतो? अधिकारी व कर्मचारी नेमके काय पाहतात?” असे प्रश्न उपस्थित केले आहेत.