सांगली जिल्ह्यात मंत्रिपदाची घालमेल ; कार्यकर्त्यांच्यात धाकधूक वाढली ; राजकीय वर्तुळात उत्सुकता
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर येथे संपन्न होणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील रेसमध्ये असलेल्या तीन आमदारांची घालमेल वाढली आहे. अद्याप पर्यंत कोणालाही याबाबतचा सांगावा अथवा बोलावणं आलेले नाही. त्यामुळे आज होणाऱ्या नागपूर येथील मंत्री मंडळाच्या विस्ताराकडे सार्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची कोंडी आज फुटणार आहे. सांगली जिल्ह्यातील कुणा कुणाची मंत्रीमंडळात वर्णी लागणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. मंत्रीपदाच्या यादीत जिल्ह्यातून आ. डॉ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुधीर गाडगीळ यांची नावे चर्चेत आहेत. भाजपचे सर्वाधिक चार आमदार सांगली जिल्ह्यातून निवडून गेले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून सांगली जिल्ह्यातून आमदार सुहास बाबर हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय आमदार मानले जातात. गत मंत्रीमंडळ मध्ये संभाव्य मंत्री मंडळामध्ये स्व. अनिलभाऊ बाबर यांचे नाव कायम अग्रभागी राहिले होते. परंतू त्यांच्या निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून जिल्ह्यातून कोणही निवडून आले नाही. मात्र विधानपरिषदे आमदार म्हणून ईद्रिस नायकवडी असले तरी त्यांचे नाव मंत्री मंडळाच्या यादीत नाही.
भाजपकडून माजी मंत्री आम. डॉ. सुरेश खाडे यांचे नाव अग्रभागी असले तरी त्यांना मागील टर्म मध्ये कोणतेही भरीव व दमदार काम करता आले नसल्याने त्यांचे नाव सध्या कट झाले आहे. तसेच सुधीर गाडगीळ यांनी देखील आमदारकीची हॅट्रिक साधली असली तरी त्यांचा व्यवसाय मोठा असल्याने ते मंत्रीपद स्वीकारतील का? हा मोठा प्रश्न आहे.
तर गोपीचंद पडळकर हे जत विधानसभेमधून मोठ्या मताधिक्याने निवडून आले असल्याने, व राज्यामध्ये त्यांचा मोठा प्रभाव असल्याने, त्यांना जर मंत्रीपद मिळाले तर, त्याचा मोठा फायदा भाजपला राज्यात होवू शकतो त्यामुळे, सध्या तरी सांगली जिल्ह्यातून आम. गोपीचंद पडळकर यांना संधी मिळणार असे स्पष्ट संकेत भाजप नेतृत्वाकडे दिले नसले गेले तरी, अंतिम क्षणी गोपीचंद पडळकर यांचे नाव येवू शकते.