आटपाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरात गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याने याचा भटक्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला आहे.
आटपाडी शहराचा विस्तार वाढत आहेत. वाढत्या विस्तारीकरणामुळे शहरात कुठेही कचरा टाकला जात आहे. यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची समस्या निर्माण झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या चावण्यामुळे रेबीजसारखे रोग होण्याची शक्यता आहे. कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम नगरपंचायतीच्या विभागाचे आहे. मात्र सध्या तरी नगरपंचायतीकडे भटकी कुत्री पकडण्याचे कोणतेही वाहन नाही.
आटपाडी शहरात अनेक हॉटेल व्यावसायिक हे राहिलेले अन्न, मांसाहारी पदार्थ ठराविक ठिकाणी टाकत आहेत. यामुळे भटकी कुत्री चावण्याचे प्रमाण वाढले आहे. कचरा टाकलेल्या ठिकाणच्या आसपास कुत्री कायम भटकत असतात. रात्रीच्या वेळी या परिसरातून जाणाऱ्या पादचारी, वाहनचालकांच्या मागे ही कुत्री धावतात. परिणामी, अपघाताला निमंत्रण मिळते. असेच प्रकार चिकन, मटनाच्या दुकानांजवळही घडत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या वतीने संबंधित स्टॉलधारकांना योग्य त्या सूचना द्याव्यात; तसेच भटकी कुत्री पकडून न्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पिसाळलेल्या कुत्रे चावल्यानंतरची लस आटपाडीत मिळावी : राहुल सपाटे
आटपाडी शहरासह तालुक्यात दररोज सरासरी १० ते १२ लोकांना भटके तसेच पाळलेली कुत्रे चावत असल्याचे दिसून येत आहे. आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात यावर लस भेटत असते. परंतु जर पिसाळलेले कुत्रे चावले तर मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. आटपाडी ते सांगली जिल्हा हे अंतर साधारणपणे ९० कि.मी.चे आहे. गरीब नागरिकांना हे तातडीने शक्य नाही. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्रे चावल्यानंतरची लस आटपाडीत मिळावी.