खासदार विशाल पाटलांची ऑफर सुहास बाबर स्विकारणार का?
आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही शब्द सोडवून आलेलो आहे. जिथे आमच्यावर प्रेम आहे तेथे आम्ही प्रेम देतो.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये स्व. आमदार अनिलभाऊ बाबर (Anil Babar) यांच्या निधनानंतर राजकारणात अनेक चढउतार होत आहेत. लोकसभेला भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी खानापूर मतदार संघातून तब्बल ८० हजार मतांची आघाडी आपणाला मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर सभेत वक्तव्य केले होते.
कारण, खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडी नावालाच असल्याने सुरुवातीला संजयकाका पाटील यांना आघाडी मिळणार असेच चित्र होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैभव पाटील, शिंदे गटाचे सुहास बाबर, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांचे मतदार संघामध्ये प्राबल्य आहे.
खानापूर विधानसभा मतदार संघातील याच राजकीय नेत्यांच्या जीवावर संजयकाका पाटील ८० मतांची आघाडी घेणार होते. परंतु अनेकांनी राजकीय नेत्यांनी येणाऱ्या विधानसभेसाठी पुढील राजकीय गणिते जुळविण्यासाठी केलेल्या गमती-जंमती मुळे संजयकाका पाटील यांना ८० हजारांचे लीड सोडा अपक्ष विशाल पाटील यांनाच लीड मिळाल्याने महायुती मधील अनेक नेते उघडे पडले आहेत.
हे सगळे असतानाच शनिवार दिनांक १७ रोजी आटपाडी बाजार समिती येथे शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्री सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अपक्ष निवडणून आलेले खासदार विशाल पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख दावेदार सुहास बाबर यांना कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली.
यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा खेळ सुरू होईल.या निवडणुकीत लाखोंने मते सुहास बाबर यांना मिळावीत, ही आमची अपेक्षा आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही शब्द सोडवून आलेलो आहे. जिथे आमच्यावर प्रेम आहे तेथे आम्ही प्रेम देतो. आम्ही ताकदीने तुमच्या पाठिशी ठाम राहणार आहोत, अशी ग्वाही देखील खासदार विशाल पाटील यांनी सुहास बाबर यांना दिली आहे. तुम्ही विधानसभेसाठी आमच्याकडून उभे रहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण, आमचे मित्र खासदार श्रीकांत शिंदे ऐकायला तयार नाहीत, असे म्हणत विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना पाठबळ देण्याचं आवाहन खानापूरकरांना विशाल पाटील यांनी केलं आहे.