मुंबईत एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवल्या
मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला (Mumbai Crime News) अटक करण्यात आली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली असून आयटी अॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (36) असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठाचे दुकान चालवतो. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
वांद्रे पूर्व येथील 30 वर्षीय गृहिणीला 14 जूनला अनोळखी क्रमांकावरून मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणारा व्यक्ती अश्लील संभाषण करू लागला. महिला दूरध्वनीवर त्याला ओरडली असता आरोपीने तिला अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवण्यास सुरूवात केली. त्यामुळे सदर महिला घाबरली. सुरूवातीला तिने दुर्लक्ष केले. पण आरोपी वारंवार त्रास देत असल्यामुळे तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) रौफ शेख यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले.
आरोपीला मोबाईलमधील तंत्रज्ञानाची अधिक माहिती-
आरोपी विवाहीत असून त्याचा दोन मुले आहेत. मुंबईतील बेहरामपाडा परिसरात आरोपी भाडेतत्त्वाच्या घरात इतर मित्रासोबत राहतो. आरोपीने गुन्ह्यांसाठी आठ विविध मोबाईलचा वापर केल्याचे तपासत निष्पन्न झाले. आरोपी कमी शिकलेला असला, तरी त्याला मोबाईलमधील तंत्रज्ञानाची बरीच माहिती आहे. त्यामुळे त्याला पकडणे अवघड झाले होते.
मुंबईतील 25 महिलांना देत होता त्रास-
तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपी खानला शुक्रवारी सापळा रचून बेहरामपाडा परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यावेळी आरोपीकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपीच्या मोबाईलच्या तपासणीत तो मुंबईतील 25 महिलांना अशा प्रकारे त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलांना आता पोलीस संपर्क साधून आरोपीविरोधात तक्रार करण्यास सांगितले आहे.