पाळीव मांजराने महिलेच्या पायाला चावा घेतल्याने महिलेचा मृत्यू
कर्नाटकातील शिवमोग्गा येथील शिकारीपूर तालुक्यातील तरलाघट्टा गावात पाळीव मांजर चावल्यामुळे एका 50 वर्षीय महिलेचा रेबीजने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तेथील रहिवाशांनी पाळीव प्राण्यांच्या हल्ल्यांच्या धोक्यांबद्दल अधिकाऱ्यांकडे चिंता व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव गंगीबाई असे आहे. दोन महिन्यांपूर्वी गंगीबाई यांच्या पायाचा पाळीव मांजराने चावाघेतला होता. या घटनेपूर्वी तारलाघट्टा येथील एका छावणीत तरुणावर मांजराने हल्ला केला होता. मांजर चावल्यानंतर, महिलेने एक इंजेक्शन घेतले. तिने रेबीज लसीकरणाचा कोर्स पूर्ण केला नाही. उपचारात निष्काळजीपणा केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असे वैद्यकीय जाणकारांनी सांगितले. रेबीज म्हणजे काय?
प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा ‘रेबीज’ हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर, म्हणजेच मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रेबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये पॅरालिसिसची समस्या निर्माण होते. काहीवेळा रुग्णांच्या व्यवहारात अचानक बदल होतो आणि रुग्ण अधिक हायपर झालेले दिसून येतात. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सूपरटेल्स नावाच्या संस्थेत वरिष्ठ पशूवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉ. पूजा कडू सांगतात, “माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर रेबीज व्हायरस अत्यंत वेगाने पसरण्यास सुरूवात होते.” तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वांत महत्त्वाचे आहेत.