सांगली जिल्ह्यातून मतमोजणी पडताळणीसाठी “यांनी” केले अर्ज
माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करत काँग्रेसने राज्यभर रान उठवले असताना सांगली आणि जत विधानसभा मतदारसंघात मत पडताळणीची मागणी केली आहे. त्यासाठी सांगलीतून उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी, तर जतमधून उमेदवार विक्रम सावंत यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. सांगलीत दहा तर जतमध्ये दोन बूथच्या पडताळणीची मागणी करत त्यासाठीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर संशयकल्लोळ वाढला आहे. महाविकास आघाडीतील बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त केला आहे. उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात मत पडताळणीची मागणी करावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सांगली आणि जत मतदारसंघांसाठी पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.
निवडणूक विभागाच्या नियमानुसार, एका बूथच्या मत पडताळणीसाठी ४७ हजार २०० रुपये शुल्क भरावे लागते. जतमध्ये विक्रम सावंत यांनी २ बूथच्या पडताळणीची मागणी करून ९४ हजार ४०० रुपये भरले आहेत. सांगलीत पृथ्वीराज पाटील यांनी दहा बूथच्या पडताळणीची मागणी करत ४ लाख ७२ हजार रुपये भरले आहेत. या दोन्ही उमेदवारांनी कोणत्या बूथबाबत शंका आहेत, त्या यंत्रांचे क्रमांकही सादर केले आहेत. त्यासाठी एक तज्ज्ञ प्रतिनिधी सुचवण्यात आला आहे.