खानापूर विधानसभा मतदार संघात दोन सुहास बाबर, दोन वैभव पाटील निवडणूक रिंगणात
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज भरले असून, दिनांक ०४ रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये २८ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून वैभव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तर महायुती कडून शिवसेना शिंदे गटाकडून सुहास बाबर हे अधिकुत उमेदवार आहेत. भाजपच्या ब्रम्हानंद पडळकर यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे. तर मी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात दोन वैभव पाटील व दोन सुहास बाबर रिंगणात उतरले असल्याने, सेम नावामुळे मतदारांच्या संभ्रम निर्माण होणार आहेत.
राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांसह किरकोळ अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत एकाच नावाचे उमेदवार उभे करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे डावपेच राजकीय पक्षांकडून खेळण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन मतांची मोठी फाटाफूट होण्याची शक्यता आहे.
खानापूर मतदार संघामध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्यात लढत होत असून, महाविकास आघाडीकडून वैभव सदाशिव पाटील व महायुती कडून सुहास अनिल बाबर प्रमुख उमेदवार आहेत. परंतु अपक्ष म्हणून आटपाडी तालुक्यातील करगणी येथील वैभव प्रतापराव पाटील यांनी अर्ज भरला आहे. तर मुळचे करमाळा तालुक्यातील हिंगणी येथील असणाऱ्या सुहास राजेंद्र बाबर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन सेम नावामुळे कुणाला किती मते मिळतात यावर प्रमुख उमेदवारचे भवितव्य अवलंबून आहे.