शिवराज राक्षेची दुहेरी पटावर इराणच्या अहमदवर मात, अवघ्या दुसऱ्या मिनिटात केलं चितपट

माणदेश एक्सप्रेस/सांगली : कृष्णा नदीकाठावर प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने अवघ्या दुसऱ्या मिनिटाला दुहेरी पट काढून इराणचा जागतिक विजेता अहमद इराण याला चितपट करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
कुस्ती प्रेमी ग्रुप आणि ट्रबल शूटिंग सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्यावतीने शिवजयंतीनिमित्त सरकारी घाटावर भारत विरुद्ध इराण अशा आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. रविवारी रात्री दहा वाजून ३३ मिनिटांनी शिवराज राक्षे विरुद्ध अहमद यांच्यात कुस्ती लागली. कुस्ती चुरशीची होईल अशी अपेक्षा असतानाच ताकदीने बलदंड असलेल्या शिवराज याने खडाखडीनंतर अवघ्या दुसऱ्या मिनिटाला दुहेरी पट काढून अहमद याला अस्मान दाखवले. तेव्हा कुस्ती शौकिनांनी एकच जल्लोष केला. ‘पैलवान आला’ या गाण्यावर ठेका धरला.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती भारत केसरी मोनू दहिया विरुद्ध भारतात आजपर्यंत अपराजित राहिलेला जागतिक विजेता मिर्झा इराण यांच्यात लावण्यात आली. मिर्झाने आक्रमक कुस्ती करताना दुसऱ्या मिनिटाला पट काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर चौथ्या मिनिटाला त्याने मोनूवर कब्जा घेतला. सातव्या मिनिटाला मोनू कब्जातून निसटला. पुन्हा आठव्या मिनिटाला मिर्झाने कब्जा घेत नवव्या मिनिटाला घुटना डावावर मोनूला चितपट केले.
पुण्याचा आंतरराष्ट्रीय मल्ल रविराज चव्हाण विरुद्ध दिल्लीचा जॉन्टी गुज्जर यांच्यातील लढतीत दुसऱ्या मिनिटाला रविराजच्या डोळ्याला दुखापत झाली. पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर कुस्ती पुन्हा लावली. दोघांमध्ये बराचवेळ खडाखडी झाली. त्यानंतर पाच मिनिटांचा वेळ दिला. त्यामध्येही निकाल न लागल्यामुळे गुणावर कुस्ती लावली. तेव्हा २५ व्या मिनिटाला रविराजने जॉन्टीवर कब्जा घेतल्यानंतर गुणावर विजयी केले.
चौथ्या क्रमांकाची सुदेश ठाकूर विरुद्ध संतोष जगताप यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडवली. अन्य कुस्त्यांमध्ये प्रदीप ठाकूर, शुभम चव्हाण, सौरभ पाटील, विशाल शेळके, राहुल आलदर, अक्षय माळी, पांडुरंग माने, रोहित चव्हाण, रुद्र खंबाळे, अली शेख, आदित्य करडे, शिवराज माने, अनुज गोसावी, अवधूत वाघ, श्रीजीत जाधव, रणवीर पाटील आदींनी चटकदार कुस्त्या करत प्रतिस्पर्धी मल्लांवर विजय मिळवला.