संतोष देशमुखांचा मारेकरी नाशिकमध्ये, कृष्णा आंधळे दुचाकीवरून फिरताना CCTV मध्ये कैद

माणदेश एक्सप्रेस/नाशिक : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. या हत्याकांडाला ३ महिने झाले तरी देखील संतोष आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिस कृष्णा आंधळेचा शोध घेत आहे. अशामध्ये कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा स्थानिकांनी दावा केला आहे.
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. एका मोटरसायकलवर कृष्णा आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळताच नाशिक पोलिसांचे पथक परिसरात दाखल झाले असून ते कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. कृष्णा आंधळे आता तरी पोलिसांच्या हाती लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.