महसूल पंधरवड्याचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ
महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणीचे शिबीर घेण्यात आले.
माणदेश एक्सप्रेस न्युज/सांगली : यावर्षी महसूल दिन 1 ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत असून आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन व महसूल पंधरवडा-2024 या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणीचे शिबीर घेण्यात आले. या शिबीरात सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शिबीरात नेत्र तपासणी, दंत चिकित्सा, उच्च रक्तदाब, सी.बी.सी., ईसीजी व मधुमेह इत्यादीची तपासणी जिल्हा शासकीय रूग्णालय सांगली, भारती हॉस्पीटल व सुदर्शन हॉस्पीटल यांच्या मार्फत करण्यात आली.
या शिबीरामध्ये एकूण 107 अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली व 92 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शितल शिंदे यांनी तणाव व्यवस्थापन यावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना व्याख्यान दिले.