महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी गद्दारी केली आहे : विश्वजीत कदम : वैभवदादा पाटील यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : महायुतीच्या नेत्यांनी आपल्या नेत्यांना दिल्ली व गुजरातच्या नेत्यासमोर झुकवून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी गद्दारी केली आहे. भाजपचे नेते जाती व धर्मावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट केले तर खपवून घेतले जाणार नाही असे प्रखड मत माजी मंत्री विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांनी केले. महाआघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांच्या प्रचाराच्या भाळवणी येथील जाहीर सभेत केले.
कदम पुढे म्हणाले की, कदम कुटुंबीय व स्वर्गीय हणमंतराव पाटील साहेबांचे कुटुंबीय आम्ही एकत्र आहोत. ज्यावेळी पतंगराव साहेबांचा भिलवडी वांगी मधून निसटता पराभव झाला. त्यावेळी खानापूर आटपाडी मतदारसंघातून स्वर्गीय हणमंतराव पाटील साहेब विजयी झाले होते. विजयी होऊनही पाटील कुटुंबीयांनी गुलालाची उधळण न करता. ते स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांना भेटायला आले. साडेसहा फूट उंच धिप्पाड मूर्ती हत्ती सारखं बळ असणाऱ्या हणमंतराव पाटील साहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कदम साहेबांना कडकडून मिठी मारून म्हणाले. विधानभवनात तुम्ही हवे होता एक परी मी नसलो असतो तरी चाललं असतं. कदम कुटुंबीय व पाटील कुटुंबियांच्या मधला अतुट नात्याचा प्रसंग या कुटुंबातील घरोबा सांगून जातो.
सदाभाऊंच्या रूपाने खानापूर मतदारसंघाला दोन वेळा नेतृत्व करण्याची संधी मिळाली. एकदा अपक्ष म्हणून दुसऱ्या वेळी काँग्रेसच्या चिन्हावरती सेवा करण्याची संधी मिळाली. सदाशिवभाऊंनी खानापूर मतदारसंघांमध्ये सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने बऱ्याच शाश्वत कामांना न्याय दिला. सध्या खानापूर आटपाडीच्या विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. लाडक्या बहिणीला पंधराशे दिले आणि महायुतीने दाजीच्या खिशातून हजारो रुपये वसूल केले. महागाईचा उच्चांक करून तुमच्या खिशातून काढून घेतले आहेत.
राजकीय कुटुंबाच्या नात्याने कदम कुटुंबीय व सदाशिवभाऊ पाटील कुटुंबीय महाविकास आघाडीच्या पाठीशी एकत्रित आहोत. आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित काम करू. स्वर्गीय हणमंतराव पाटील साहेब, माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील आणि वैभवदादा पाटील यांचे कार्य कर्तृत्व पाहून महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. आपल्या पक्षातील सर्व छोट्या-मोठ्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी वैभवदादा पाटील यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून वैभव दादा पाटील यांना प्रचंड ताकद आणि ऊर्जा द्यावी. मतदार संघातील राहिलेला उर्वरित सर्वांगीण विकास करण्याची धमक वैभवदादा पाटील यांच्यामध्ये आहे.
माजी आमदार सदाशिव पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्याने डॉ. स्वर्गीय पतंगराव कदम साहेब, स्वर्गीय आर.आर. आबा पाटील आणि जयंत पाटील साहेब हे विकासात्मक राजकारण करणारे नेतृत्व या तिघांच्या रुपाने दिले. अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये सांगली जिल्ह्यात थोडा थोडा पाऊस झाला आणि पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी शेतकऱ्यांना मदत करता येत नव्हती. कारण अधिकारी सांगायचे 65 मिलिमीटर इतका पाऊस पडलेला नाही त्याची नोंद नाही. त्यामुळे अतिवृष्टीची मदत करता येत नाही. त्यावेळी हे तीन नेते मंत्रिमंडळाच्या बैठकी अगोदर अधिकाऱ्यांना घेऊन बसायचे आणि यातून काय मार्ग काढून मदत कशी करता येईल याची चर्चा करायची मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यायचे. आणि शेतकऱ्यांना मदत व्हायची. आणि हे सर्व महाविकास आघाडीचे सरकारच करू शकते. आणि म्हणून महाविकास आघाडी सोबत सर्वांनी राहा.
यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख म्हणाले, भाजप सरकार वोट जिहाद च्या वल्गना करत जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत. कोणत्याही धर्माचा द्वेष करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे. महाविकास आघाडीला मतदान करणारे वोट जिहाद आणि पुण्यातील ब्राह्मणांनी भाजपला मतदान केले की तो वोट जिहाद नाही का? बटेंगे तो कटेंगे कहा से बटेंगे हम कहा से कटेंगे एक है तो सेफ है| या भाजपच्या नाऱ्या वरती मिश्किली करत देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्र गुजरातला नेऊन ठेवला आहे. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प पॉस्कोन, वोक्सवॅगन गुजरातला नेले. ते महाराष्ट्रातच असते तर तरुणांच्या हाताला काम मिळाले असते अर्थकारण बदलले असते.
महिलांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांना सुरक्षितता द्या. भाळवणीत किती विकास झाला किती रस्ते झाले. मतदारसंघात गेल्या दहा वर्षात कोणताही शाश्वत विकास या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्या. महाविकास आघाडीचा महिलांना सुरक्षितता देणारा शक्ती कायदा केंद्रात का पास झाला नाही? महाविकास आघाडी जीवनावश्यक पाच वस्तूंचे दर स्थिर करणार आहे.
भाजपची अवस्था ‘एक फुल दोन हाप’ अशी झाली आहे. एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री अडीच वर्षात यांना बहिण आठवली नाही निवडणुकीच्या तोंडावर आठवली. अल्पसंख्यांक असुरक्षित आहे. मराठा समाजाला न्याय ओबीसी, धनगर, मुस्लिम समाजाला न्याय आणि सुरक्षितता महाविकास आघाडीचे सरकारच देऊ शकते. एका बाजूला पैशाची मस्ती व दुसऱ्या बाजूला कर्तृत्ववान उमेदवार वैभवदादा पाटील आहेत. त्यांच्यात काहीतरी करण्याची धमक आहे. त्यांच्या पाठीशी सर्व ताकद उभी करा.
या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रा. सु.गवई गटाचे हेमंत भोसले यांनी पाठिंब्याचे पत्र माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. स्वागत प्रास्ताविक राष्ट्रवादी वक्ता सेलचे संतोष जाधव त्यांनी केले. यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, शिवसेनेचे संजय विभुते, माजी तालुका पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, शिवप्रतापचे विठ्ठल साहेब साळुंखे, कुमार शेठ निकम, जयसिंग शिंदे, अरविंद गायकवाड, केशव धनवडे, दिशांत धनवडे, तोहीद मुजावर, हीफजू रहिमान मुल्ला, हेमंत भोसले आदींनी भाषणे केली.
या कार्यक्रमाला सयाजी धनवडे, नितीनराजे जाधव, जयकर साळुंखे, सचिन शिंदे,रघुनाथ पवार, दशरथ साळुंखे, शिवाजी शिंदे,शिवराज भोसले,असलम मुल्ला उपसरपंच, पांडुरंग कांबळे आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आभार हणमंत धनवडे यांनी मानले.