आटपाडीताज्या बातम्या

करगणीमध्ये भाजपला मोठा राजकीय धक्का ; विद्यमान तीन ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीला जाहीर पाठिंबा

हा जाहीर पाठिंबा करगणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार विनायकराव मासाळ आणि करगणी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.

माणदेश एक्सप्रेस न्यूज /  करगणी / प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करगणी गावाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून भारतीय जनता पक्षाला येथे जोरदार धक्का बसला आहे. करगणी ग्रामपंचायतीच्या ४ नंबर वार्डातील भाजपचे तिन्ही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव माने (ट्रिपल ग्रामपंचायत सदस्य), अभिजीत जाधव व आण्णा कांबळे तसेच त्यांच्या सौभाग्यवती सौ. रूपाली आण्णा कांबळे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

हा जाहीर पाठिंबा करगणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार विनायकराव मासाळ आणि करगणी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. या घडामोडीमुळे करगणीतील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

यावेळी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले की, “गावाचा सर्वांगीण विकास, शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व आम्हाला अपेक्षित आहे. केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वासोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.” करगणी व परिसराच्या विकासासाठी एकसंघपणे काम करणाऱ्या शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणे हा गावाच्या हिताचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विनायकराव मासाळ यांनी आपल्या भाषणात सर्व नव्याने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “करगणीचा विकास हा आमचा केंद्रबिंदू आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस काम केले जाईल. अनुभवी लोकप्रतिनिधी आमच्या सोबत आल्याने महायुती अधिक मजबूत झाली आहे.” पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय पाटील यांनीही गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमाला करगणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. भाजपचे विद्यमान तीन सदस्य एकाचवेळी बाहेर पडल्याने करगणीमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद कमी झाली असून, या राजकीय धक्क्याचे पडसाद तालुकाभर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button