❝विधानभवनाबाहेर आव्हाड-पडळकर आमने-सामने, कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की; सभागृहातही पडसाद❞
सभापतींनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबंधित व्यक्तींवर कारवाईचा इशारा दिला आहे.

मुंबई, माणदेश एक्सप्रेस न्यूज | 17 जुलै 2025
विधानभवन परिसर पुन्हा एकदा राजकीय संघर्षाचे रणांगण बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या वादाला आता चिघळलेले स्वरूप आले आहे. आज विधानभवनाच्या पायऱ्यांजवळच दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.
या वादाचा व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये दोन्ही आमदार एकमेकांशी तोंडाने भिडताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी रेड कार्पेटवरून विधानभवनात जाताना नाव न घेता पडळकरांवर घणाघात केला होता. त्यानंतर आज कार्यकर्त्यांमध्ये झालेली ही झटापट नेमकी त्याच वादाचा पुढचा अध्याय मानली जात आहे.
घटनेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हल्ल्याची सुरुवात पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी केली. यापेक्षा जास्त पुरावा आम्हाला देण्याची गरज नाही. जर तुम्ही गुंडांना विधानसभेत प्रवेश देणार असाल, तर आम्ही काहीही बोलणार नाही का?” असे म्हणत त्यांनी सरकारवरही टीकेची झोड उठवली.
या घटनेचे पडसाद सभागृहातही उमटले. आमदार सना मलिक यांनी विधानसभेत उपस्थित राहून सांगितले की, “आम्हाला विधानभवनात येताना अडचणी निर्माण केल्या जात आहेत. सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरत आहे.” अनेक आमदारांनीही यावर चिंता व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली.
राजकीय तापमान चढले…
या प्रकारामुळे विधिमंडळाच्या परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांचे समर्थक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून, आगामी अधिवेशनात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.