भारताच्या विजयाने आटपाडीत जल्लोष

तरुणाई रस्त्यावर, फटाक्यांची आतषबाजी ; जोरदार घोषणाबाजी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : न्यूझीलंड-भारत क्रिकेट सामन्यात भारताचा चित्तथरारक विजय झाल्यानंतर आटपाडी शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत दिवाळी साजरी केली. सामना संपताच फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. येथील आण्णाभाऊ साठे चौकात तर जत्रेचे स्वरूप आलेले होते. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. चौका-चौकात वाद्यांच्या तालावर तरुणाई थिरकत होती.
दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चषक स्पर्धेत रविवारी सायंकाळी भारताने न्यूझीलंडचा पराभव करीत चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली. यानंतर आटपाडीतील तरुणाईने आणि क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. येथील आण्णाभाऊ साठे चौकात फटाक्यांची आतषबाजी व हलगीवादन करीत एकप्रकारे दिवाळी साजरी केली. सुट्टीचा रविवार आणि त्यातच अंतिम मॅच असल्याने मोठी स्क्रीन लावून क्रीडाप्रेमींना सामन्याचा आनंद लुटला. रवींद्र जडेजा याने चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आणि चौका-चौकात जोरदार आतषबाजीला सुरुवात झाली.