खरसुंडीतील मातंग वसाहतीमध्ये गटारीचे सांडपाणी नागरिकांच्या घरात ; वंचित घटकांच्या प्रश्नांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
सदर गटारीचे काम २० तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर युवकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे मातंग वसाहतीमध्ये गटारीचे सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरू लागले असल्याने मातंग समाजातील युवकांनी स्वातंत्र्यदिनी सांडपाण्याच्या प्रश्नावरून रास्ता रोको केल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.
खरसुंडी जिल्हा परिषद शाळेजवळील मातंग समाजाच्या लोकवस्तीलगत अपूर्ण अवस्थेतील गटार दीर्घकाळापासून तुंबलेल्या अवस्थेत होते. गटारीचे सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरून आरोग्याचे प्रश्न गंभीर बनला होता. ग्रामपंचायतीकडे वारंवार सूचना करूनही दखल न घेतल्याने युवकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनासमोर ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केला. ग्रामपंचायतीकडून गटार पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. सांडपाण्याच्या प्रश्नावरून वारंवार आश्वासन मिळत असल्याने युवकांनी आक्रमक पवित्रा घेत १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी खरसुंडी-आटपाडी रस्ता अडवला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शेखर निचळ रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. पोलिसांनी व सरपंच धोंडीराम इंगवले यांनी आंदोलकाशी चर्चा केली व तात्काळ जेसीबीने सहाय्याने पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू केले. सदर गटारीचे काम २० तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर युवकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा साजरा करताना वंचित घटकांच्या प्रश्नांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
खरसुंडी : मनोज कांबळे