‘मला या भावांना सांगायचं, हे नातं 1500 रुपयाला विकाऊ नाही’; सुप्रिया सुळेंचा सरकारला टोला
महाविकास आघाडीने आजपासून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून हे बिगूल फुंकण्यात आलं आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज तडाखेबंद भाषण केलं. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून थेट सर्वांच्या काळजाला हात घालतानाच सरकारला चांगलंच फटकारलंय. विशेष करून राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे.
लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील सत्तेतील भावांना बहिणींची आठवण झाली नाही. पण निवडणुकीत पराभव होताच त्यांना बहिणींची आठवण झाली आहे. त्यामुळेच लाडकी बहीण योजना आणली. हे सरकार म्हणतंय एक बहीण गेली तर काय झालं? दुसरी बहीण येईल. मला या भावांना सांगायचं, हे नातं 1500 रुपयाला विकाऊ नाही हो, असं सुप्रिया सुळे यांनी अशा शब्दात सरकारला टोला लगावला. पण सुप्रिया सुळे यांनी हे उद्गार काढताच अनेकांच्या काळजात चर्र झालं.
हा नात्याचा अपमान
आमच्या नात्याचा हा अपमान आहे. बहीण भावाच्या नात्याचा हा अपमान आहे. मुळातच बहीण आणि भावाचं प्रेम असतं. त्याला किंमत लावली जात नाही. पण या सरकारने त्याला किंमत लावण्याचं पाप केलं आहे, असा जोरदार हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. या सरकारने केवळ मतांसाठी प्रेम आणि व्यवसायात गल्लत केली आहे. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतो तर व्यवसायात प्रेम नसतं. व्यवसायात प्रेम आलं तर नातं अंगावर येतं आणि नात्यात व्यवसाय आला तर तिथे प्रेम राहत नाही, असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी लगावला.
पैसे परत घेऊन दाखवाच
लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर काढून घेणार असल्याचं विधान सत्ताधारी आमदार करत आहेत. त्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणुकीनंतर ऑक्टोबरमध्ये लाडकी बहीण योजनेचे 10 हजार रुपये काढून घेतले जाणार आहेत. ज्या महिलांनी मतदान केलं नाही, त्यांचे पैसे परत घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण तुम्ही पैसे काढून तर दाखवाच… असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी केला.