शहीद जवान काकासाहेब पावणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
केंद्रीय राखीव पोलिस दलात सेवा बजावत असलेले विभूतवाडी येथील हवालदार काकासाहेब पावणे हे इमारतीवरून पाय घसरून खाली कोसळले.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील शहीद हवालदार काकासाहेब पावणे यांच्या पार्थिवाचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
केंद्रीय राखीव पोलिस दलात सेवा बजावत असलेले विभूतवाडी येथील हवालदार काकासाहेब पावणे हे इमारतीवरून पाय घसरून खाली कोसळले. यांत त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्याना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव जम्मू मधून विशेष विमानाने पुण्याला आणण्यात आले. तेथून त्यांना आटपाडी मार्गे विभूतवाडी येथे आणण्यात आले.
विभूतवाडी येथे येथे शहीद हवालदार काकासाहेब पावणे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अमर रहे अमर रहे काकासाहेब पावणे अमर रहे अशा जयघोषामध्ये गावामध्ये अंत्ययात्रा आणण्यात आली. नंतर त्यांच्या घरी अंत्ययात्रा पोहोचली. तेथे पार्थिवाचे सर्वांनी दर्शन घेतले. त्यानंतर विभूतवाडी हायस्कूलच्या पटांगणामध्ये अंत्यविधी करण्यात आला. विभूतवाडी हायस्कूल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी झालेल्या शोकसभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सामान्य परिस्थितीतून संघर्ष करून काकासाहेब पावणे केंद्रीय पोलीस दलात भरती झाले होते. देशासाठी ते शहीद झाले आहेत. याचा अभिमान आम्हाला आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, तालुक्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी करून ते शहीद झाले आहेत. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यावेळी माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, शिवसेना नेते सुहास बाबर, विट्याचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हा ध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील आजी-माजी सरपंच विविध संस्थेचे चेअरमन उपस्थित होते.
हवेत फैरी झाडून सलामी
यावेळी आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी शासकीय इतमामात हवेत फैरी झाडून सलामी दिली. यावेळी आटपाडी पोलीस निरीक्षक विनय बहिर, तहसीलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.