काँग्रेसकडून नांदेड लोकसभेसाठी उमेदवारीची घोषणा
काँग्रेसने अधिकृतपणे परिपत्रक जारी करत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
माणदेश एक्सप्रेस न्युज : नवी दिल्ली /प्रतिनिधी : नांदेड पोटनिवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. नांदेड लोकसभा (Loksabha) पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसने अधिकृतपणे परिपत्रक जारी करत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे नांदडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण (MP Vasant Chavan) यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे येथील जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या सहीने पत्र जारी करण्यात आले असून रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे, आता नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडून कोणाला उमेदवारी देण्यात येईल, याची चर्चा राजकीय वर्तुळात असून अनेकांना उत्सुकता लागून आहे.
काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीचा जिल्हा काँग्रेसने ठरावही संमत केला होता. त्यानंतर, आज अधिकृतपणे दिल्लीतील काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.