आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. ८ मधून शिवसेनेच्या निशिगंधा शरद पाटील यांचा दणदणीत विजय

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेनाच्या उमेदवार निशिगंधा शरद पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवला आहे. दिनांक २१ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय, आटपाडी येथे पार पडलेल्या मतमोजणीत निशिगंधा पाटील यांनी एकूण ६९७ मते मिळवत प्रभागावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
या प्रभागात यंदा तिरंगी लढत रंगली होती. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार जयश्री बाबासो पाटील यांना ३३० मते मिळाली असून त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. तर भाजपच्या उमेदवार सुनिता शंकर काळेबाग यांना ६९ मते मिळाली. याशिवाय NOTA ला एकूण ५ मते मिळाल्याची नोंद आहे.
मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराने आघाडी कायम ठेवली होती. अंतिम फेरीअंती विजय अधिकृत होताच प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. विजयाची माहिती मिळताच समर्थकांनी निशिगंधा पाटील यांचे अभिनंदन करत “शिवसेनेचा विजय असो” अशा घोषणा दिल्या.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना निशिगंधा पाटील म्हणाल्या की, “हा विजय माझा वैयक्तिक नसून प्रभागातील सर्व नागरिकांचा आहे. दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मूलभूत नागरी सुविधा, स्वच्छता, महिला व युवकांसाठी विकासकामे प्राधान्याने राबवली जातील.”




