आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. १६ मधून शिवसेनेचे बाळासाहेब हजारे दणदणीत विजयी

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीदरम्यान प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब तुकाराम हजारे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. आज तहसील कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत बाळासाहेब हजारे यांनी तब्बल १०३७ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेतली. त्यांच्या या विजयामुळे प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या प्रभागात यावेळी बहुरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपचे उमेदवार विनायक बाळकृष्ण पाटील यांना ३३६ मते मिळाली असून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तर अपक्ष उमेदवारांमध्ये महेशकुमार दिगंबर पाटील यांना १८, आदित्य जनार्दन सातपुते यांना ०५, अक्षय दिगंबर जाधव यांना ०४ मते मिळाली. NOTA ला ०४ मते नोंदवली गेली. निकाल स्पष्ट होताच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विजयी झालेले बाळासाहेब हजारे हे सामाजिक क्षेत्रात परिचित नाव आहे. ते यापूर्वी भिंगेवाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात ग्रामविकास, पाणीपुरवठा, रस्ते आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला होता. तसेच ते प्रसिद्ध उद्योगपती राहुल हजारे यांचे वडील असल्याने त्यांच्या अनुभवाचा लाभ नगरपंचायत प्रशासनाला होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
विजयानंतर बोलताना बाळासाहेब हजारे यांनी मतदारांचे आभार मानत “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे. प्रभागातील विकासकामांना गती देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा माझा प्रयत्न असेल,” असे सांगितले. त्यांच्या या विजयामुळे आटपाडी नगरपंचायतीच्या राजकारणात शिवसेनेला बळ मिळाले असून आगामी काळात सत्तासमीकरणांवर याचा परिणाम दिसून येणार आहे.




