आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. ११ मधून भाजपच्या ललिता जाधव यांचा दणदणीत विजय

आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ११ मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ललिता अशोक जाधव यांनी विजय मिळवला आहे. या प्रभागात यावेळी बहुरंगी लढत पाहायला मिळाली. मात्र मतदारांनी विकास, स्थिर नेतृत्व आणि संघटनात्मक ताकदीवर विश्वास दाखवत भाजपच्या उमेदवाराला कौल दिला.
मतमोजणी तहसील कार्यालयात शांततेत पार पडली. अंतिम निकालानुसार भाजपच्या ललिता अशोक जाधव यांना ५२८ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनाच्या शीतल नितीन चौथे यांना ३११ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार शालन जोतीराम कुंभार यांनी ६० मते मिळवली, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवाराला २९ मते मिळाली. NOTA ला १७ मते नोंदवली गेली.
सकाळी मतमोजणी सुरू होताच पहिल्याच फेरीत ललिता जाधव यांनी आघाडी घेतली होती. अखेर निर्णायक फेरीत त्यांचा विजय निश्चित झाला. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला.
विजयानंतर बोलताना ललिता जाधव यांनी मतदारांचे आभार मानले. “प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था आणि महिला-युवकांसाठी विकासकामे प्राधान्याने राबवणार आहे. हा विजय म्हणजे जनतेने दिलेली जबाबदारी असून ती प्रामाणिकपणे पार पाडेन,” असे त्या म्हणाल्या.
या निकालामुळे आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील हा विजय आगामी नगरपंचायत राजकारणात महत्त्वाचा मानला जात असून, स्थानिक पातळीवर भाजपचा प्रभाव वाढल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत.



