जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रम जाहीर ; ‘या’ दिवशी होणार मतदान
आता मतदान ७ फेब्रुवारीला, मतमोजणी ९ फेब्रुवारीला

माणदेश एक्सप्रेस न्यूज / सांगली : राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक–२०२६ संदर्भातील सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यापूर्वी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने दि. २८ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान राज्यव्यापी दुखवटा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सूचना दि. ३१ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी प्रसिद्ध करावी.
नव्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसाठी मतदान दि. ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे.
त्यानंतर दि. ९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांची नावे दि. ११ फेब्रुवारी २०२६ (बुधवार) पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील.
दरम्यान, या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असून निकाल जाहीर होईपर्यंत ती अंमलात राहणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.



